प्रकरण एक - गर्विष्ठ गिल्गमेश आणि एंकिडूचे आगमन

गर्विष्ठ गिल्गमेश

उरुकच्या भव्यदिव्य नगरीचा महाबलशाली अनभिषिक्त सम्राट - गिल्गमेश. तो राजा लुगालबंद (माणूस) व देवी निन्सुनचा सुपुत्र. गिल्गमेश दोन तृतीयांश मनुष्य, तर एक तृतीयांश देव आहे. याच्यामागे काय तर्क आहे ते देवाधिदेव अनुच जाणे. माझा अंदाज असा की, गिल्गमेशला विविध देवांकडून अनेक वर मिळाले आहेत, त्याच्यावर शमाशचा कृपाहस्त आहे, ज्ञानदेवतेने त्याला ज्ञान दिले आहे, पुढे देवी अरुरुनेही त्याला बनविण्यात मदत केली आहे. एकूण काय, असे सगळे वर मिळाल्याने तो २/३ देव आणि १/३ माणूस आहे.

उरुक शहराभोवती गिल्गमेशने बांधून घेतलेली उत्तुंग व अभेद्य तटबंदी होती. उरुक एकदम प्रगत होते. अनुचे भव्यदिव्य मंदिर, इश्तारचे मंदिर, सुंदर सजवलेले चौक, निन्सुनचा स्पेशल महाल, ग्रॅंड बाजार वगैरे वगैरे सगळ लेटेस्ट आणि ढिंकचाक. 

मिस्टर गिल्गमेश अशक्य शक्तिशाली असल्याने अर्थातच माजुर्डे होते. राज्यातील सगळ्या तरुण पोरासोरांना त्याने अविरत कामाच्या घाण्याला जुंपले होते. लहान मुलांनासुद्धा. (काय काम त्याचा उल्लेख नाहीये, पण हे बांध, ते बांध असे काम असावे), शिवाय जातायेता दिसला एखादा तरुण की त्याला बळजबरी कुस्ती खेळायला लावून मग हाणायचा. बायकांच्या बाबतीत तर फारच वाईट नजर. राज्यातील प्रत्येक कुमारीला उष्टे करूनच सोडायचा. मग ती एखाद्या शूरवीर सरदाराची बायको असो वा भाजीवाल्याची मुलगी, त्याला काय फरक नाही - हा त्यांना नासवणारच. त्यादृष्टीने समता होती राज्यात. एकूणच रयतेचे मोराल लो होते, सगळे नागवले गेले होते.

उरुकच्या ज्येष्ठ नागरिकांनी देवांची करुणा भाकली. ती भारी आहे. तिच्यात त्यांनी वरचे सगळे रिपीट केले. 

पूर्ण गिल्गमेशच्या गोष्टीतच भयंकर रिपिटेशन आहे. तेच तेच इतक्यांदा लिहिले आहे, की काय बोलायची सोय नाही. आपण (म्हणजे मी तरी) परीक्षेत करायचो तसे. 

प्रश्न: त्रिभुज प्रदेश का निर्माण होतात? 
उत्तर: नदी जिथे समुद्रास मिळते तिथे त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, याचे कारण असे की... ...याच कारणामुळे नदी जिथे समुद्रास मिळते, तिथे त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. 

गिल्गमेशची गोष्ट विटांवर कोरणाऱ्या कामगारांनापण कदाचित सांगितले गेले असावे - हे बघा मिस्त्री, एवढी गोष्ट आहे. एवढ्या विटा लागल्याच पाहिजेत बरं का. आणि एक - मनाचे काहीही लिहू नका, जे दिलंय तेच लिहा. हां, अजून एक शेवटचं - काम पूर्ण झाल्यावर एकसुद्धा रिकामी जागा दिसता कामा नये हां. तंगड तोडून हातात देईन नाहीतर. 

काय करणार बिचारे कामगार, तेच तेच लिहीत बसले.

तर उरुकच्या ज्येष्ठ नागरिकांनी देवांची करुणा भाकली. त्याचा सारांश असा - हा गिल्गमेश सर्व पोरांवर कावतो, सर्व पोरींना झवतो, तरी हा आमचा राजा आहे. हा हुशार आहे, शूर आहे, आमचा मार्गदर्शक आहे. पण असा असतो का राजा? थोडक्यात देवहो, आमचा राजा बदलू नका, त्याचा स्वभाव बदला. 

ज्येष्ठांचे अभिनंदन केले पाहिजे या पॉइंटला आपण सर्वांनी. काळाच्या पुढचे विचार आहेत. उगाचच राजाबिजा बदलला आणि नवीन याच्याहून बेकार निघाला म्हणजे काय? (किंवा नवीन राजाच नाही मिळाला म्हणजे आली का पंचाईत?) आज, याच उरुकप्रदेशात, लोकांना असाच त्रास देणारा सद्दाम बदलल्यावर काय चालू आहे, ते आकाशातून सर्वशक्तिमान अनुदेव बघतच असेल.
*

एंकिडूचा जन्म

सर्व देवांनी ज्येष्ठांची प्रार्थना ऐकली आणि तीच सगळी अनु व अरुरुकडे रिपीट केली. देवांनी घातलेली भर म्हणजे - देवी अरुरु, तू या गिल्गमेशला निर्माण केलंस, तसाच त्याच्यासारखा आणखी एक शक्तिमान मनुष्य त्याला धडा शिकवण्यासाठी तयार कर. मग भिडवू आपण दोघांना. हौन जाऊ दे. वादळाचा सामना वादळाने, काट्याने काटा. (अशी वाक्ये आहेत गोष्टीत). अशा तर्‍हेने उरुकमधे शांतता नांदेल.

देवी अरुरु विचार करायला लागते. (लक्ष्यात ठेवा, अरुरुसाठी आपण केट ब्लॅंचेटला निवडले आहे. सारखे अरुरु, अरुरु लिहिताना मला तुरुरु, तुरुरु गाणे आठवून वाटते की काजोलच अरुरु आहे का काय.)

नवीन पोट्टा कसा असेल याचा एक आराखडा अरुरु मनात बनवते. ती त्या पोट्ट्याला कशापासून बनवते याचे वर्णन जरा गुंतागुंतीचे आहे. स्वर्गातील देवांचे जे तत्त्व आहे ते तत्व घेऊन ती आपले हात चिखलात घालते व त्यातून बनलेला प्राणी करून जंगलात सोडते.

तिलिस्मी एकदम. अशा रीतीने आला एंकिडू!

एंकिडूचे रूप काय वर्णावे - साक्षात युद्धदेव निनृताची ताकद, त्याचेच रूप. एकदम तगडा, रांगडा गडी. बरेच वर्णन आहे काय-काय त्याचे पुढे. मक्याच्या कणसातले तुरे असतात ना, तसे त्याचे केस वार्‍यावर भुरुभुरु हलायचे वगैरे वगैरे. एकूण अर्थ, तो एकदम छावा होता. गिल्गमेशच्या तोडीस तोड. नुकताच जन्म झाल्याने निरागस होता मुलगा. नावपण गोड वाटते ऐकायला - एंकिडू. त्याला शेतीभाती, शिकार असले काही माहीत नव्हते. हरणांबरोबर रोज चरायचा. त्यालापण हरणांसारखे पाणवठ्यावर जायला आवडायचे. हरणांनाही तो आवडायचा. हरणांच्यासाठी लावलेले सापळे हा मोडायचा, खड्ड्यात पडलेल्या हरणांना सोडायचा, मग त्यांच्याबरोबर एकत्र चरायचा. दिवसभर मनसोक्त चरणे आणि आजूबजूच्या जंगलात हुंदडणे. बास. कुत्र्यांनापण त्याच्यापेक्षा जास्त काम असेल.
*

शमात एंकिडूला शमविते

असा एंकिडूचा एकंदर हॅपी गो लकी दिनक्रम चालू असताना, त्या भागातील शिकार्‍याला मात्र काव आला होता. आपण लावलेले सापळे कसे तुटतात, खड्डे कसे बुजतात हे शिकार्‍याला कळेना. मग एक दिवस त्याने एंकिडूला पाणवठ्यापाशी हिंस्र प्राण्यांबरोबर पाणी पिताना पाहिले आणि तो भीतीने ठार गोठून गेला.(कदाचित भीतीने दोनचार थेंब शूपण झाली असेल त्याला.) सलग तीन दिवस त्याने एंकिडूला पाणवठ्यावर पाहिले आणि दररोज न चुकता त्याची फाटली. तिसर्‍या दिवसानंतर मात्र त्याने - असे रोज घाबरण्यात काही अर्थ नाही, काहीतरी केले पाहिजे - असे म्हणून एक उपाय केला. युनिव्हर्सल उपाय आहे, आजही लागू. तो तडक त्याच्या बाबांकडे गेला आणि या एंकिडू प्राण्याचे वर्णन केले - आकाशातल्या तार्‍यासारखे तेज, जणू अनुदेवाचेच रूप, खूप शक्तिशाली... चाराण्याच्या एंकिडूला बाराण्याचा मसाला लावून त्याने वर्णन केले. माझे सगळे सापळे तोडतो, याच्यामुळे काही शिकार मिळत नाही, काय करू बाबा, काय करू मी... असे रडला.

बाबांनी शांतपणे ऐकले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले - उरुकमधे गिल्गमेश नावाचा राजा आहे. (मग शिकार्‍याने जे काही एंकिडूचे भव्यदिव्य वर्णन केले होते, ते सर्व जसेच्या तसे त्यांनी गिल्गमेशला लागू केले. तेच सगळे. आकाशातला ताराबिरा.) तर त्याच्याकडे जा, गिल्गमेशला म्हणाव, असा असा एक नवीन माई-का-लाल आला आहे जंगलात. (मग पर..त एंकिडूचे सेम वर्णन.) मला तुमच्या इश्तारच्या देवळातली सर्वात सुंदर गणिका द्या. गिल्गमेश तुला ती देईल. तिला घेऊन तू एंकिडू जिथे गावतो तिथे जा. ती त्याला बरोब्बर माणसाळवेल. मग जंगलातले प्राणी त्याला आपल्यात घेणार नाहीत, हरणं त्याच्या संगतीत राहणार नाहीत. तू शांतपणे शिकार करत बस मग. 

एवढे साधे - त्याला बाईच्या नादाला लाव - एवढे सांगायला फारच वेळ लावला आहे गोष्टीत.

शिकारी गिल्गमेशकडे जातो, परत तेच सगळे एंकिडूचे वर्णन. गिल्गमेशने लगेच इश्तारच्या देवळातल्या (प्रेममंदिरातल्या) शमात नावाच्या हुशार, चुणचुणीत कार्यकर्तीला शिकार्‍याबरोबर जायला सांगितले. गिल्गमेश रंगेल गडी असला, तरी उत्तम प्रशासक होता असे दिसतेय.

शिकारी व शमात पाणवठ्यावर पोचले. तिथे पहिले दोन दिवस तर एंकिडू आला नाही. तिसर्‍या दिवशी मात्र एका कळपाबरोबर त्याचे आगमन झाले. (लहान मुलांनी यापुढचा परिच्छेद वाचू नये.)

आता शिकारी शमातला म्हणतो - हा बघ, हाच तो एंकिडू. अजिबात वेळ दवडू नकोस. तुझे सुंदर स्तन उघडे कर, त्याला तुला बघू दे. जसा तो जवळ येत जाईल, तशी हळूहळू नग्न हो. मग हा रानटी आणि तू. त्याला शिकव प्रणयबिणय. एंजॉय. (त्यानंतर परत तेच सगळे तिला सांगितले, की एंड रिझल्ट म्हणजे प्राणी त्याला नाकारतील, माझा शिकारीचा प्रॉब्लेम सुटेल... शिकारी म्हणजे अतीच फोकस्ड प्राणी आहे यार. एकतर अशा अप्सरेबरोबर एकट्याने नीट प्रवास केला. नंतर एकदम शांतचित्ताने, मॅटर ऑफ फॅक्ट टोनमध्ये - स्तन उघडे कर, नागडी हो - असे तिला सांगितले. त्याचे लक्ष्य एकच आहे. मला माझी शिकार परत व्यवस्थित मिळाली पाहिजे. आजच्या काळात हा शिकारी आला, तर मी त्याला विनाइंटरव्ह्यू माझ्या टीममध्ये घेईन.) 

शमातला असलं काही करायला काय अडचण नसते. (म्हणजे अडचण नसलेलीच बाई पाठवणार ना ते लोक? इथे अडचण शब्दावरून - द्वय काय त्रयर्थीही - विनोद होऊ शकतो. सुज्ञाश्लीलांस अधिक काय सांगणे?) 

एंकिडू तिच्याकडे आकर्षित होतो. मग ते सहा दिवस-सात रात्री अविरत प्रणय करतात. बेलगाम प्रणय रचतात. सेक्स सेक्स सेक्स. सहा दिवस, सात रात्री! मॅराथॉन. या काळात तो हरणं-बिरणं, टेकडी, गवत सगळे विसरतो. साहजिकच आहे. सातव्या रात्रीनंतर मात्र तो तृप्तभावनेने परत जंगलात जातो, किंबहुना जायचा प्रयत्न करतो. पण जंगलजनता काही त्याला आपल्यात घेत नाही. त्यांच्या दृष्टीने तो बाटला. तो त्यांच्या मागे पळायचा प्रयत्न करतो. पण त्याला पूर्वीएवढे जोरात पळता येत नाही. एंकिडू रानटी असला, तरी हुशार असतो. तो शमातकडे परत जातो आणि शांतपणे तिच्या पायाशी बसतो.

पूर्वी आपण ज्येष्ठांचे केले, तसे या सुंदर शमातचेही अभिनंदन केले पाहिजे. तिचे काम खरेतर झाले होते, पण तरी she went for an extra mile, आणि एंकिडूसाठी थांबली.

ती एंकिडूला म्हणाली, अरे, तू शक्तिमान आहेस, हुशार आहेस, देवासारखाच आहेस जणू. कुठे इथे रानावनात आयुष्य वाया घालवतो आहेस? चल लेका माझ्याबरोबर. उरुकला जाऊ, तिथं इश्तारच मंदिर आहे, अनुचं मंदिर आहे, तुझ्यासारखाच शक्तिशाली गिल्गमेश आहे. एखाद्या गव्याच्या माजाने तो उरुकभर फिरत असतो मस्त. 

हे ऐकून एंकिडूलापण जावेसे वाटते, शिवाय त्यालापण कोणीतरी मित्र हवासा वाटत असतो. हरणे, हिंस्र प्राणी आता आपल्यात घेत नाहीत, म्हणून त्याला तनहा तनहा वाटतच होते. मित्र हवासा वाटत असतो असे लिहिले आहे. पण ते अनाकलनीय आहे. का ते वाचाच - 

तो शमातला म्हणतो, चल सखे, मला तिथे घेऊन. 

आपण हे एका वाक्यात संपवले. पण तिने सांगितलेल्या सर्व वर्णनाचे एक आवर्तन करून मगच तो तिला म्हणतो - तर अशा उरुकमधे मला घेऊन चल. 

पुढे तो असेही म्हणतो की - मी सर्वशक्तिमान आहे, मी प्रस्थापितांना आव्हान देऊन सगळी सिस्टीम बदलू शकतो. तेवढा खमक्या आहे मी. रानमाळात जन्मलेल्या कुणाकडेही तेवढी ताकद असतेच. 

प्रस्थापितांना आव्हान म्हणजे गिल्गमेशलाच हो. आणि कुणाला? पण एंकिडू स्पष्ट तसे म्हणत नाही. सहा दिवस मुलीबरोबर काय राहिला, भाषाच बदलली याची.

यावर लगेच जास्त काही प्रतिक्रिया न देता शमात म्हणते - चल तर मग उरुकला. मी तुला दाखवते कुठे आहे गिल्गमेश. मला पक्कं माहीत आहे, तो उरुकमधे कुठे असेल ते. 

मग परत उरुकचे वर्णन - या वर्णनाचे सार हे की, उरुक एकदम पार्टी प्लेस आहे. गोवाच जणू. 

विषय बदलून झाल्यावर परत गिल्गमेशच्या मुद्द्याकडे वळून ती म्हणते - तो तुझ्याहून नक्कीच बलवान आहे. (मधेच परत त्याचे सेन्शुअल वर्णन) त्याच्यावर सूर्यदेव शमाश, अनु, ज्ञानदेव एन्लिल या सर्वांचा वरदहस्त आहे. तेव्हा मित्रा, तू जरा दमाने घे. तू उरुकमधे पोचायच्या आधीच गिल्गमेशला तुझं स्वप्न पडलं असेल. 

या प्रकरणातला शमात-एंकिडू संवाद इथे संपला आहे.
*

गिल्गमेशची स्वप्ने आणि निन्सुनचा सल्ला

शमातचे बोलणे संपते ना संपते, तोच इकडे गिल्गमेश झोपेतून उठतो आणि तडक आईकडे जातो. गिल्गमेशविषयी एक सांगणे गरजेचे आहे. याला देवांनी खूप ज्ञान दिले आहे, असे प्रत्येक प्रकरणात शंभरदा म्हटले आहे. पण हा सद्‌गृहस्थ ते ज्ञान कुठे वापरताना दिसतच नाही. त्याला स्वप्ने पाडून पाडून देव भविष्याबद्द्लची चाहूल/सूचना देतात. पण या ठोंब्याला त्या स्वप्नांचा अर्थ कळतच नाही. कायम जाऊन दुसर्‍यांना विचारतो. कदाचित त्याला कन्फर्मेशन विचारायला आवडत असेल. असते एकेकाची पद्धत आणि विचारसरणी. आपण नाही का, लावलेले कुलूप कधी कधी चारचारदा ओढून बघतो.

गिल्गमेश आईला आपले स्वप्न सांगतो - मला काल असं स्वप्न पडलं, की आकाशातून एक तारा खाली आला. माझ्याकडेच थेट. अनुदेवासारखा चमकत होता. मी त्याला उचलायचा प्रयत्न केला, पण मला काही जमलं नाही. मग हलवायचा (तारा) प्रयत्न केला, तेपण जमलं नाही. उरुकमधले सर्व प्रतिष्ठित लोक, माझी मित्रमंडळी, आपले सरदार असे सगळे त्याच्याभोवती जमून त्याचे कौतुक करू लागले, त्याच्या पायाचे त्यांनी चुंबन घेतले. (तार्‍याच्या पायाचे, म्हणजे जरा खालच्या भागाचे, घेतले असेल. जास्त शंका नकोत.) एखाद्या स्त्रीकडे आकर्षित व्हावे तसा मी त्या तार्‍याकडे ओढला जात होतो. शेवट मी त्याला तुझ्या चरणाशी अर्पण केले. (गिल्गमेशच्याने तर हा तारा हलत, उचलत नव्हता. म्हणजे त्याने आईलाच तिथे बोलावले, अर्पण केलेला तारा स्वीकारायला.) मग तू म्हणालीस, की हा तारा माझ्यासमानच आहे. तर प्रिय आई, गोमाता निन्सुनदेवी, हा सगळा काय गोमकाला आहे?

निन्सुन उत्तर देते. एव्हाना वाचकांनी ओळखले असेल, आधी तर निन्सुन त्याचे सगळे स्वप्न परत त्यालाच ऐकवते. नंतर तिला लागलेला अर्थ सांगते, की - तुला तुझ्या तोडीस तोड असा एक बलशाली मित्र मिळणार आहे, तू त्याच्याकडे एखाद्या स्त्रीसारखा आकर्षित झालास, म्हणजे तो तुला कधी सोडणार नाही. संकटकाळीसुद्धा तुझी साथ देईल.

हे ऐकून गिल्गमेश आईला पुढच्या स्वप्नाचा अर्थ विचारतो. पुढचे स्वप्न कट टू कट पहिल्या स्वप्नासारखेच आहे. फक्त तार्‍याऐवजी कुर्‍हाड आहे यात. आईपण तोच अर्थ सांगते. खरे आहे बाबा, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
*

इथे पहिली टॅबलेट-वीट-मृद्‌लेख, जे काय आहे, तो संपतो. पहिला लेख बर्‍यापैकी चांगल्या परिस्थितीमधे आहे.  पुढील सगळ्या विटा अधेमधे खराब आहेत. त्यामुळे जर गोष्ट रटाळ वाटली, तर तो दोष माझ्या लिखाणाचा नसून या टॅबलेट खराब करणार्‍यांचाच आहे. माझ्या शुद्धलेखनाचा तर अजिबात दोष नाही.
***

१. गिल्गमेश दोन तृतीयांश देव का आहे यावर बरेच शोधनिबंध आहेत मेसोपोटेमिअम लोकांत. ६० म्हणजे देव, गिल्गमेश ४० होता, वगैरे वगैरे.
२. मला अवतरण चिन्ह या प्रकाराचा अशक्य कंटाळा आला आहे. म्हणजे मी रोज चोवीस तास अवतरण चिन्हे बघत किंवा काढत नसतो. पण आला आहे कंटाळा. अचानक ती नकोशी झालीत मला. तो म्हणाला, "...", ती म्हणली, "...", यांव झालं, "...". काय त्रास. जमेल तसे आपण ती टाळू या. स्वल्पविराम आणि आडवी रेघ मला लय आवडतात. ती पोतेभर वापरू.
३. उरुक जबरा आहे - कसे ते इथे वाचा.

0 comments: