प्रकरण चार - सिडारवन प्रवेश

या प्रकरणात जास्त काही घडामोडी नाहीयेत. कदाचित छपाईकामगार दमले असतील किंवा पगारवाढीसाठी संथलेखणी-टाईप काहीतरी आंदोलन केले असेल त्यांनी.
*

उरुकहून प्रवास

गिल्गमेश आणि एंकिडूंनी प्रवास सुरू केला. आधी ठरल्याप्रमाणे एंकिडूच्या मागोमाग गिल्गमेश. वीस योजने झाल्यावर त्यांनी खाऊन घेतले. अजून तीस योजने चालल्यावर मग रात्रीसाठी मुक्काम करायचे ठरवले. अशा रीतीने त्यांची मजल-दरमजल सुरू होती. सामान्य मनुष्य दीड महिन्यात जेवढे चालेल तेवढे ते तीन दिवसातच चालले. आता बोला. 

हेच वर्णन अजून दोन-तीनदा येते या विटेत परत.

मला खरे तर वाचकांना गणितही घालता येईल - यावरून त्रैराशिक मांडून, सामान्य उरुकवासीय एका दिवसात किती योजने चालतो ते सांगा. मग एक छोटा जावास्क्रिप्टचा कोड टाकावा लागेल. उत्तर बरोबर आले, तरच पुढची गोष्ट वाचायला मिळणार. पण कशाला शायनिंग? जे कोण अर्धमेले इथवर आले आहेत, तेपण पळून जातील.

तिसर्‍या दिवशी रात्री मुक्काम केल्यावर, गिल्गमेश जवळच्या टेकडीवर जातो. रात्रीच्या भोजनासाठी तयार केलेले सुग्रास अन्न अर्पण करून तो म्हणतो - हे पर्वता, मला चांगले संकेत देणारे स्वप्न पडू दे. 

असाच प्रवास करत दोघे सिडारवनाच्या प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतात. सिडारवनाचे ते अक्राळविक्राळ रूप पाहून गिल्गमेशची फाटते. तो म्हणतो - आत प्रकाश जरा कमी वाटतो आहे, जाऊ या का परत? ज्याने एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली आहे त्याच्या आणि ज्याला नुसती ऐकीव माहिती आहे अशांच्या मतातला हाच तो फरक. तरी एंकिडू घसा फाडून सांगत होता, की अरे, डेंजर आहे रे सिडार. तेव्हा - काही नाही रे भावा, जाऊ आपण, मी आहे ना - वगैरे सुरू होते याचे. प्रत्यक्षात नुसते प्रवेशद्वार बघून गिल्गमेश टरकला.
एंकिडूने सामन्याची सूत्रे हाती घेतली. तो करवादला - अरे, अत्त्युच्च तटबंदी असलेल्या प्राचीन उरुकनगरीचा नरेश तू. महान लुगालबंदाचं रक्त तुझ्या धमन्याधमन्यांतून वाहते आहे. साक्षात शमाशकूळातील निन्सुनचा सुपुत्र तू. सावर स्वत:ला. आठव तुझे उरुकमधले बोल - मेलो तर मेलो, पण चार रट्टे देऊनच मरेन असे म्हणाला होतास ना? काही नाही होत. मी आहे ना बरोबर? चल, ताबडतोब जंगलात शिरू. हुंबाबा बाहेरच्या बाजूलाच आहे असा माझा अंदाज आहे. तो आत-आत जायला लागला, तर आपलं काम अजूनच अवघड होईल. त्याच्या एकूण सात प्रभा आहेत. आत्ता त्याने त्यातील एकच प्रभा धारण केली आहे. ही त्याच्याशी लढायची एकदम आदर्श वेळ आहे, चला बिगी बिगी.

हे सगळे ऐकून गिल्गमेशचा आत्मविश्वास जरा वाढला. तो म्हणाला - होय, होय. बरोबर आहे तुझं, शमाशदेवाचा वरदहस्त असताना घाबरायचे ते काय?

सगळे धैर्य एकवटून त्यांनी एकदाचा सिडारवनात प्रवेश केला.
*

एंकिडू गळबटला

जसजसे ते दोघे आत जाऊ लागले, तसतसा आता एंकिडूचा धीर सुटू लागला. हुंबाबाचे रौद्ररूप आठवून त्याचा जीव घाबराघुबरा झाला. तो गिल्गमेशला म्हणाला - आपण इथपर्यंत आलोय हीच एक मोठी अचीव्हमेंट आहे तसं बघायला गेलं तर. आजपर्यंत कोणीही मनुष्य वनात एवढ्या आत घुसला नव्हता. आपला सामना... 

त्याचे बोलणे मधेच थांबवत, गिल्गमेश म्हणाला - ए ए ए एंकिडू! कमॉन यार, तू स्वत:ला फारच कमी लेखतोस. तुझं अलौकिक युद्धकौशल्य मी स्वत: बघितलं आहे. काय तो तुझा आवेश! तुझे हे बलशाली बाहू जगातील कुठल्याही अमानवी शक्तीला नमवू शकतील. तू फक्त माझ्या वस्त्रांना स्पर्श कर, तुझी सगळी भीती निघून जाईल, तुझे लटपटणारे हात स्थिर होतील. माझ्यासवे राहा गड्या, बास. 

गिल्गमेशला कर्मयोग हळूहळू चढत होता. तो पुढे म्हणाला - मृत्यूला विसर. धोकादायक कार्य जर काळजीपूर्वक हाती घेतले असेल, तर काही इजा होत नाही. या असल्या साहसी खेळात कदाचित आपण हरू आणि मृत्यूला कवटाळावे लागेल; पण आपली कीर्ती अमर होईल, देवांसारखीच.

एंकिडूने स्वत:ला सावरले आणि दोघे परत पुढे चालू लागले. हुंबाबा म्याटरच असे होते की दोघे एकमेकाला कसाबसा धीर देत मार्गक्रमणा करत होते. 

थोड्या वेळाने ते सिडारवनातील हिरव्यागार पर्वतपायथ्याशी येऊन पोहोचले.

इथे आपले दोन हिरो पडद्याकडे पाठ करून पर्वतपायथ्याशी उभे आहेतो आणि पुढे प्रचंड हिरवागार क्रूरलुकिंग पर्वत असे दृश्य मनात आणा (लॉंग वाईड शॉट). एक-दोन मिनिटे फील घेऊन मगच पुढचे प्रकरण बघू.
***

१. २० योजने झाल्यावर खायचे आणि ३० योजनांनंतर मुक्काम, हा गिल्गमेशचा स्टॅंडर्ड पॅटर्न आहे.
२. खरेतर यानंतरचा टॅबलेटचा बराच भाग खराब असल्याने गिल्गमेश घाबरतो वगैरे अनुमान आहे. कारण एंकिडू त्याला समजावत आहे की - चल लेका, घाबरू नकोस.
३. हे प्रभा प्रकरण जरा संदिग्ध आहे. हुंबाबाची सात जादूई कवचे, त्याच्या सुरक्षिततेसाठी बनवलेले सात कोट किंवा सरळसरळ त्याची सात कुंपणे असू शकतात.
४. मला अपेक्षित असलेल्या दृश्याला लॉंग वाईड शॉट ही संज्ञा योग्य आहे का नाही माहीत नाही, पण द्यायचे आपले ठोकून.

0 comments: