प्रकरण आठ - एंकिडूचा मृत्यू व गिल्गमेशचा शोक

एंकिडूचा मृत्यू

गिल्गमेश एंकिडूचा हात आपल्या हातात धरुन बसला होता. एंकिडूचे मी जातो असे निर्वाणीचे बोल ऐकल्यावर त्याला लय वंगाळ वाटतं. आपला सुंदर रंगीबेरंगी सिनेमा इथे पूर्णपणे ब्लॅक ॲंड व्हाईट झाला आहे.
बराच वेळ झाल्यावत गिल्गमेश म्हणतो - एंकिडू बाळा, सर्व जग आज दु:खी आहे. आपण सिडारवनातील पालथे घातलेले सगळे रस्ते आज रडतील. उरुकचे ज्येष्ठ आज रडतील. यादी लांब आहे. खालील सर्व वस्तू/प्राणी रडतील - 
१. देव
२. उरुकदेश
३. तरस
४. चित्ता
५. बोकड
६. हरीण
७. सर्व वन्यप्राणी
८. उल्ला नदीच्या काठाकाठाने आपण संध्याकाळी किती सुंदर फेरफटका मारायचो - ती उल्ला
९. आपल्या पराक्रमाची साक्षीदार युफ्रेटीस
१०. उरुकमधले सर्व सैनिक
सगळे जग आज रडतेय एंकिडू, माझ्या एंकिडू रे.

पहाटे एंकिडूची प्राणज्योत मालवली. गिल्गमेशने त्याला उठवायाचा खूप प्रयत्न केला. तो रडत रडत म्हणू लागला - असली कसली रे, झोप तुझी मित्रा, उठ ना. चल, आपण उरुकच्या तटबंदीवर जावू, रानावनात जावू. पण एंकिडू काही उठला नाही. गिल्गमेशने एंकिडूच्या छातीला डोके लावले पण त्याला ठोके ऐकू आले नाहीत. शेवट त्याने महत्प्रयासाने, एंकिडूचा चेहरा पांढर्‍या कपड्याने झाकला.
गिल्गमेशने हंबरडा फोडला - ऐका हो ऐका, माझा परममित्र एंकिडू निर्वतला आहे, त्याच्यासाठी मी अगदी स्त्रीसारखे ढसाढसा रडतो आहे. माझी सगळी सुंदर शस्त्रास्त्रे माझ्याजवळच आहेत पण हिर्‍याहून प्यारा माझा मित्र काळाने हिरावून घेतला. मग गिल्गमेश सगळा फ्लॅशबॅक कथन करतो. (आम्ही कसला हुंबाबाला धुत्ला, रेड्याला रडवला वगैरे - गिल्गमेशच्या दु:खातही वीररस आहे, काय करावे आता)
जोरजोरात अशी बडबड करत गिल्गमेश झपाझपा येरझार्‍या घालू लागतो. स्वत:चे सगळे कपडे फाडून टाकतो, सुंदर मका-कणीस-सोनेरी-तुरा केस उपटतो. वेडा होतो अक्षरश:
उजाडल्यावर तो उरुकमधील सर्व सोनार,लोहार, तांबार, आणि विविध कारागीरांना बोलावतो. त्यांना एंकिडूची महती सांगतो, त्याचा प्रचंड मोठा पुतळा तयार करायला सांगतो. बरेच स्पेकस आहेत, सोन्याचं हृदय, नीलमण्याचे नेकलेस, फुल्टू रत्नजडित पुतळा. (जेणेकरुन गिल्गमेश मेल्यावर नंतर कोण उरुकमधे आक्रमण करेल त्यांना हे घबाड गावेल.) कारागीरांना उरुकबाहेरील पर्वतात कुठे कुठले हिरे, सोनं कुठे मिळेल हे सगळे सांगतो. वेगवेगळी उरुकमधे न मिळणारी फळे कुठे मिळतात ते सांगतो. झालच तर, युफ्रेटीसमधून होडीत घालून-घालून सगळा माल आणा असं सांगतो. ही सर्व एंकिडूच्या महाअंतिमयात्रेची जय्यत तयारी.

काही दिवसांनी, सगळं सामान जमा होतं. गिल्गमेश शमाशला मध, दही यांचा नैवेद्य दाखवतो. प्रार्थना म्हणतो, सजवलेल्या एंकिडूचे अंत्यविधी करतो. एक शूर अध्याय संपला. मग राज्यात दुखवटा जाहीर करतो, आपल्या अनुपस्थितीत कोण उरुकचा कारभार बघेल हे सर्व ज्येष्ठांना सांगतो.
आपले सगळे कपडे उतरवतो, केस विस्कटतो, मेलेल्या कुत्र्याचे कातडे पांघरतो आणि राज्याबाहेर निघून जातो. समोर प्रचंड माळरान, पाठमोरा एकटा गिल्गमेश हातात काठी घेवून उभा आहे - असा लॉंगवाईड शॉट.

अशा तर्‍हेने गिल्गमेश आणि एंकिडूमधील ब्रोमान्स दु:खदरित्या संपुष्टात आला आहे.
***

हे प्रकरण तसे छोटे आहे, एका ओळीत सांगयचे तर - एंकिडूचा मृत्यू व गिल्गमेशचा शोक एवढेच आहे. त्यातही मुख्यत्वे, गिल्गमेशच्या घोषणा, एंकिडू मेला, मी आता असं करेन, तसं करेन, असा शोक व्यक्त करेन वगैरे. आपण तरी काय करणार तो भावूक झाला होता.

0 comments: